नियोजनशून्य नगरपालिकेच्या कारभाराचे आणखी एक उदाहरण
बीड | प्रतिनिधी
बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर वाढलेल्या मोकाट जनावरांच्या समस्येमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात धम्मानंद वाघमारे हे गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दलित पॅंथर बीड जिल्हा अध्यक्ष धम्मानंद वाघमारे हे शनिवारी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बीड बसस्थानकासमोरून साठे चौकाकडे मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी मुख्य रस्त्यावर अनेक मोकाट गायी बसलेल्या होत्या. याचवेळी परिसरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याने रस्त्यावर पुरेसा प्रकाश नव्हता. अंधारामुळे रस्त्यावर बसलेली जनावरे त्यांना दिसली नाहीत आणि त्यांच्या मोटारसायकलची एका गायीला जोरदार धडक बसली.
या अपघातात धम्मानंद वाघमारे हे मोटारसायकलवरून खाली फेकले गेले. त्यांचा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
बीड शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वाढता वावर, बंद असलेले पथदिवे आणि संबंधित यंत्रणेकडून होत असलेले दुर्लक्ष यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, मोकाट जनावरे हटविणे, पथदिवे नियमित सुरू ठेवणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.












