राज्य सरकारकडून माणिक वाघमारे यांच्या मागणीची दखल
बीड प्रतिनिधी :
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून १ ऑगस्ट हा दिवस “लेखन प्रेरणा दिन” म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाचे विविध साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. याप्रसंगी अरुण खेमाडे, दत्ताभाऊ सौंदरमल, दीपक तांगडे, मीनाक्षी देवकते, कमल लांडगे, भूषण वाघमारे, सम्यक सरवदे यानी सत्कार केला.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ज्येष्ठ साहित्यप्रेमी माणिक वाघमारे यांनी सांगितले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून व शाहिरीतून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना शब्द दिले. त्यांच्या साहित्याने सामाजिक परिवर्तनाची दिशा दिली असून नव्या पिढीतील लेखकांना प्रेरणा मिळावी, यासाठी “लेखन प्रेरणा दिन” ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे.
ते पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ वाचनापुरते मर्यादित नसून ते समाजपरिवर्तनाचा जाहीरनामा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आणि तरुणांमध्ये लेखनाची आवड निर्माण करण्यासाठी राज्यभर विविध साहित्यिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणे ही स्वागतार्ह बाब आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला “लेखन प्रेरणा दिन” म्हणून मिळालेली ही नवी ओळख त्यांच्या साहित्यकार्याला आणि सामाजिक योगदानाला अभिवादन करणारी असून, नव्या पिढीला लेखन व सामाजिक बांधिलकीची प्रेरणा देणारी ठरेल, असा विश्वास माणिक वाघमारे यांनी व्यक्त केला.












