स्व. विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमालेचे चौथे पुष्प केजमध्ये संपन्न
केज | प्रतिनिधी
आधुनिक जीवनशैलीतील अनियमितता, ताणतणाव आणि असंतुलित आहारामुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. अशा स्थितीत आपले आरोग्य सुदृढ राखण्यासाठी आहार, व्यायाम, मानसिकता, स्वच्छता आणि नियमितता या पंचसूत्रीचा अवलंब करणे हीच दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन लातूर येथील प्रसिद्ध सर्जन डॉ. राम जावळे यांनी केले.
केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथे जीवन विकास शिक्षण मंडळ संचलित ‘स्व. विश्वंभर कोकिळ जीवन विकास व्याख्यानमालेचे’ चौथे पुष्प गुंफण्यात आले. यावेळी ‘आपले आरोग्य आपल्या हाती कसे घ्यावे?’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालरोग तज्ज्ञ डॉ. दिनकर राऊत होते.
आरोग्याची पंचसूत्री
डॉ. जावळे यांनी आरोग्यासाठी पाच महत्त्वाचे स्तंभ मांडले:
संतुलित आहार: जेवणात पालेभाज्या, ताक, दही आणि पाण्याचे प्रमाण वाढवून साखरेचे पदार्थ व भाताचे प्रमाण कमी करावे.
व्यायाम: सकाळी योगासने, सूर्यनमस्कार, चालणे किंवा पोहणे यामुळे रक्ताभिसरण सुधारून स्नायू मजबूत होतात.
मानसिकता: ताणतणाव टाळण्यासाठी ध्यान, प्राणायाम आणि आवडीचे छंद जोपासावेत.
स्वच्छता: केवळ परिसरच नाही, तर विचारांची स्वच्छताही महत्त्वाची आहे.
नियमितता: औषधांपेक्षा आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे जास्त गरजेचे आहे.
स्वास्थ्य म्हणजे स्थिर राहणे – डॉ. दिनकर राऊत
अध्यक्षीय समारोपात डॉ. दिनकर राऊत म्हणाले की, “स्वास्थ्य म्हणजे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची परिपूर्ण अवस्था होय. जो स्वतःमध्ये स्थिर आहे तो स्वस्थ. सध्याच्या धावपळीच्या युगात ‘स्ट्रेस फॅक्टर’ सर्व आजारांचे मूळ आहे. ज्यांनी सकारात्मक विचार स्वीकारले, त्यांनीच जगात अलौकिक कार्य केले आहे.” यावेळी त्यांनी गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा दाखला दिला.
मान्यवरांची उपस्थिती
या प्रसंगी संस्थेचे सचिव जी.बी. गदळे, सहसचिव उपेंद्र कोकिळ, ज्येष्ठ पत्रकार दिपकराव देशपांडे, एम.डी. घुले उपस्थित होते. कार्यक्रमाचा परिचय बालकृष्ण चोले यांनी करून दिला. सूत्रसंचालन भालचंद्र केजकर यांनी केले, तर आभार रघुनाथ चौरे यांनी मानले. पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली.












