पोलिस प्रशासन न्यूज.

नागसेन बुद्धविहारात वर्षावासाचा शुभारंभ; आषाढ पौर्णिमेनिमित्त बुद्धवंदना उत्साहात


बीड | प्रतिनिधी

आषाढ पौर्णिमा तथा गुरुपौर्णिमेनिमित्त धानोरा रोड येथील नागसेन बुद्धविहारात वर्षावासाचा शुभारंभ अत्यंत धम्ममय वातावरणात करण्यात आला. यानिमित्त आयोजित बुद्धवंदना कार्यक्रमाला पंचशील नगर परिसरासह शहरातील विविध भागांतील बौद्ध उपासक-उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्मश्रद्धा व्यक्त केली. कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव पूज्य भिक्खू डॉ. सुमेधबोधी (ए)चैत्यभूमी मुंबई यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रारंभी त्यांच्या हस्ते भगवान तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्धवंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. व्ही. एन. निसर्गंध (भारतीय बौद्ध महासभा) यांनी केले. तर प्रा. व्ही. आर. गाडे यांनी आषाढ पौर्णिमा आणि वर्षावासाचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व उपस्थितांसमोर उलगडून सांगितले.

धम्मदेशनेत पूज्य भिक्खू डॉ. सुमेधबोधी यांनी भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील आषाढ पौर्णिमेचे विशेष महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, इ.स.पूर्व ५२८ मध्ये सिद्धार्थ गौतम यांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर सारनाथ येथे त्यांनी कौंडिण्य, वप्प, भद्दिय, अश्वजित आणि महानाम या पंचवर्गीय भिक्खूंना चार आर्यसत्य आणि आर्य अष्टांगिक मार्गाचा पहिला उपदेश दिला. त्यामुळे आषाढ पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.

पावसाळ्याच्या काळात भिक्खूंनी एका ठिकाणी राहून धम्माचा प्रचार-प्रसार व अध्ययन करावे, असा भगवान बुद्धांचा संदेश असल्याने आषाढ पौर्णिमेपासून पुढील तीन महिन्यांचा कालावधी वर्षावास म्हणून पाळला जातो, असेही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी उमाजी वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले. खीरदानाचे आयोजन करून सर्वांना वाटप करण्यात आले आणि अत्यंत मंगलमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.


84
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!