केज/प्रतिनिधी:
येथील रामकृष्ण परिवाराच्या साधक आणि ज्ञानेश्वरीच्या अभ्यासक सौ. दिपालीताई संतोष काटे यांना अकोला येथे आयोजित भव्य सोहळ्यात ‘राज्यस्तरीय कर्तृत्व शिखर महिला रत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अकोला येथील सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ‘युवा विचारपीठ प्रतिष्ठान’च्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
दिमाखदार सोहळा आणि मान्यवरांची उपस्थिती
स्त्रीच्या कर्तृत्वाचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रांत ठसा उमटविणाऱ्या ५५ कर्तृत्ववान महिला आणि १५ सामाजिक संस्थांना गौरवण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अकोल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, महापौर सौ. शारदाताई खेडकर, अदिती अर्बनचे संस्थापक अध्यक्ष सुरेशराव देवकर, पोलीस निरीक्षक सौ. मालतीताई कायटे, प्राचार्य रामेश्वरजी भिसे, आरटीओ अधिकारी सौ. त्रिवेणीताई घोलप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
विनाप्रशिक्षण ज्ञानेश्वरीचा प्रसार
सौ. दिपालीताई काटे यांनी कोणतेही औपचारिक प्रशिक्षण न घेता ‘भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी’ या ग्रंथाचा सखोल अभ्यास केला आहे. प.पू. वासुदेवराव खंदारे गुरुजींच्या सान्निध्यात त्यांनी अध्ययन पूर्ण केले. आज त्या उत्तम प्रवचनकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ज्ञानेश्वरीचा प्रचार व प्रसार करत आहेत. त्यांच्या मधुर वाणीतून होणारे ओघवत्या भाषेतील विवेचन ऐकून तज्ज्ञ परीक्षकांनी या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली.
सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षावसौ. दिपालीताईंना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल रामकृष्ण परिवारासह केज तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशामुळे महिलांच्या अध्यात्मिक आणि सामाजिक कर्तृत्वाला नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.












