मुंबई: “केंद्र सरकारने देशाची आर्थिक स्वायत्तता आणि राजकीय सार्वभौमत्व अमेरिकेसारख्या परकीय शक्तींकडे गहाण ठेवले आहे,” असा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या धोरणांच्या निषेधार्थ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाब विचारण्यासाठी २३ मार्च रोजी नागपूर येथील RSS मुख्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.
मुंबईतील फोर्ट परिसरातील ठाकर्सी हाऊस येथे रविवारी (१० मार्च) एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अॅड. आंबेडकर बोलत होते.
’भारत सरकार सेल आऊट झाले आहे’
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्लाबोल करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारत सरकार केवळ आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर राजकीयदृष्ट्याही ‘सेल आऊट’ झाले आहे. अमेरिकेच्या ‘ऑफिस ऑफ फॉरेन ॲसेट्स कंट्रोल’ (OFAC) ने जारी केलेल्या ‘जनरल लायसन्स १३३’चा दाखला देत त्यांनी सांगितले की, भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेची परवानगी घ्यावी लागते, ही देशाच्या स्वायत्ततेवर मोठी गदा आहे.
”आर्थिक बाजारपेठ सरेंडर झाली आहे आणि राजकीय निर्णय घेण्याची शक्ती दुसऱ्यांच्या प्रभावाखाली गेली आहे. अशा दबावाखाली असलेल्या व्यक्तीला तुम्ही देशाच्या पंतप्रधानपदी कसे ठेवू शकता? याचा जाब आम्ही २३ मार्चला संघाला विचारणार आहोत,” असे आंबेडकर यांनी ठणकावून सांगितले.
काँग्रेसचा आंदोलनाला सक्रिय पाठिंबा
या बैठकीला काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांचीही उपस्थिती होती. त्यांनी अॅड. आंबेडकरांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत २३ मार्चच्या आंदोलनात काँग्रेस सक्रिय सहभागी होईल, असे जाहीर केले. “बाळासाहेबांनी मांडलेली ही भूमिका काळाची गरज आहे,” असे सपकाळ म्हणाले. मात्र, मोदींवरील आरोपांबाबत अद्याप ठोस पुरावे समोर आले नसल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
आंदोलनाची मुख्य कारणे आणि पार्श्वभूमी:
आर्थिक स्वायत्तता: रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेच्या अटी मान्य केल्याचा आरोप.
बँकिंग क्षेत्र: सरकारच्या धोरणांमुळे मध्यमवर्गीयांच्या बचतीवर आणि बँकिंग क्षेत्रावर संकट येण्याची भीती.
राजकीय दबाव: भारताची परराष्ट्र नीती स्वतंत्र राहिली नसल्याचा दावा.
२ मार्च रोजी मुंबईत झालेल्या यशस्वी जनआंदोलनानंतर आता नागपूरमधील RSS मुख्यालयासमोर होणारे हे आंदोलन राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून देण्याची शक्यता आहे. या आंदोलनात मध्यमवर्गीय नागरिक आणि विविध क्षेत्रातील लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आले आहे. 











