केज | लाईव्ह अशोका टाईम्स.प्रतिनिधी
ज्या माउलीमुळे लेकींना शिक्षणाची दारे खुली झाली, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती स्वामी दयानंद प्रतिष्ठान संचलित राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळेत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे शाळेतील अनेक विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंची वेशभूषा करून त्यांना अभिवादन केले, ज्यामुळे संपूर्ण शालेय परिसर ‘छोट्या सावित्रींनी’ गजबजला होता.
जीवनपट मांडला विद्यार्थ्यांसमोर
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती चाटे बी.बी. होत्या. प्रमुख वक्त्या श्रीमती अनिता जाधव व श्रीमती ध्वजा गायकवाड यांनी सावित्रीबाईंच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग सांगून त्यांचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला. प्रतिकूल परिस्थितीत समाजाला सकारात्मक दिशा देण्यासाठी सावित्रीबाईंनी दिलेले योगदान त्यांनी अधोरेखित केले. विचार मंचावर शाळेतील ज्येष्ठ शिक्षक व्ही.बी. यादव यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
रुढी-परंपरांच्या नायनाटाचे कार्य
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका श्रीमती चाटे म्हणाल्या की, “सावित्रीबाई केवळ महिलांना शिक्षण देऊन थांबल्या नाहीत, तर त्यांना सक्षम व धाडसी करण्यासाठी त्यांनी समाजातील विविध अनिष्ट रुढी-परंपरांचा नायनाट करण्याचे कामही केले.”
प्रभात फेरीत उत्स्फूर्त सहभाग
शाळेतील कार्यक्रमाव्यतिरिक्त, सकाळी रोटरी क्लब ऑफ केजच्या वतीने आयोजित प्रभात फेरीमध्येही शाळेतील इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यशस्वी आयोजन
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापिकांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी अनेक विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.एस. क्षीरसागर व ए.डी. देशमुख यांनी केले, तर आभार जे.आर. मस्के यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जी.बी. डीरंगे यांनी विशेष परिश्रम घेतले.














