अंबड,जालना :७० वर्षीय महिलेला जातीवाचक शिवीगाळ; अंबड तालुक्यातील पाथरवाला (खु) येथील घटना. घरासमोर बसल्याच्या किरकोळ कारणावरून एका ७० वर्षीय दलित ज्येष्ठ महिलेस मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना अंबड तालुक्यात पाथरवाला (खु) येथे घडली आहे. या प्रकरणी गोंदि पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (Atrocities Act) भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे.
🛑 काय आहे नेमके प्रकरण?
श्रीमती चंद्रभागा अर्जुन साळवे (वय ७०) असे पीडित महिलेचे नाव आहे. त्या पाथरवाला (खु) येथील रहिवासी असून त्या घरी एकट्याच राहतात. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला त्यांच्या घरासमोर बसलेल्या असताना गावातील मराठा समाजातील महिला श्रीमती त्रिशिला दत्तू भोजने व तिचा मुलगा ऋत्विक भोजने यांनी त्यांच्याशी वाद घातला. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि यावेळी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपींचे घर फिर्यादीच्या घरासमोर असल्याने यापूर्वीही त्यांच्यात किरकोळ वाद झाले होते, असे सांगण्यात येत आहे.
दोन आरोपींना अटक
घटनेनंतर पीडित महिलेने गोंदि पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी खालील महत्त्वपूर्ण कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे:कलम तपशील
BNS कलम 115(2) स्वेच्छेने दुखापत करणे
BNS कलम 352 जाणूनबुजून अपमान / शांतता भंग
BNS कलम 351(1) आपराधिक धमकी
BNS व Atrocities Act कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va)
(जातीय अपमानाशी व अत्याचाराशी संबंधित कलमे)या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस शिधेश्वर धुमाळ करीत आहेत. जातीय अत्याचाराच्या या गंभीर घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.













