पुणे: आधुनिक काळात समाज परिवर्तनासाठी सोशल मीडिया हे प्रभावी साधन ठरत आहे. याच माध्यमाचा उपयोग फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेच्या प्रसारासाठी अधिक प्रभावीपणे कसा करता येईल, या उद्देशाने वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने पुणे येथे ‘फुले, शाहू, आंबेडकराईट्स सोशल मीडिया अवेअरनेस’ ही विशेष प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली.
सोशल मीडिया ‘रणांगण’; मशाल कधीही मंद होऊ देऊ नका – जितरत्न पटाईत
कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले राज्य प्रमुख (सोशल मीडिया) जितरत्न पटाईत यांनी तरुणाईला बहुमोल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, आजच्या काळात सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ‘विचार प्रसाराचं रणांगण’ बनले आहे.
”प्रत्येक पोस्ट, प्रत्येक व्हिडिओ आणि प्रत्येक कमेंट ही फुले, शाहू, आंबेडकरी विचारांची नवी मशाल ठरू शकते. या मशालीचं उजेड कधीही मंद होऊ देऊ नका. कारण आजची एक प्रभावी पोस्ट उद्याचा एक जागरूक मतदार घडवू शकते,” असे महत्त्वपूर्ण मत त्यांनी व्यक्त केले.
पटाईत पुढे म्हणाले की, फुले–शाहू–आंबेडकरांचा विचार आणि प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व यांचा संदेश डिजिटल माध्यमातून घराघरात पोहोचवणे हीच खरी सामाजिक क्रांती आहे.
प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष सत्रे,
या कार्यशाळेत कार्यकर्त्यांना सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कृतीतून शिकण्यावर भर देण्यात आला. प्रशिक्षण, चर्चासत्रे आणि प्रत्यक्ष सोशल मीडिया सत्रे असे तीन टप्पे यावेळी घेण्यात आले.
कार्यकर्त्यांना पोस्ट डिझाईन
व्हिडिओ निर्मिती
डिजिटल कॅम्पेनिंग
यांसारख्या अत्यावश्यक डिजिटल कौशल्यांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी प्रबुद्ध भारतचे आकाश एडके यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. त्यांनी संविधानवादी आणि फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा प्रसार सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे कसा करता येईल, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. माजी प्रवक्ते (वंचित बहुजन आघाडी) संतोष संखद यांनीही मार्गदर्शन केले.
संयोजन आणि उपस्थिती,
कार्यक्रमाचे संयोजन सागर नामदेव आल्हाट (पुणे शहर अध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी) यांनी केले, तर अध्यक्षस्थानी रक्षणीताई शेंडकर होत्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीकांत चौगुले यांनी केले .
पुणे शहरातील विविध प्रभागांमधून युवा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सोशल मीडिया टीम सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेनंतर उपस्थितांनी मत व्यक्त केले की, या प्रशिक्षणामुळे तरुण कार्यकर्त्यांमध्ये समाज माध्यमांवर संघटनात्मक काम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्याची नवी उर्मी आणि आत्मविश्वास निर्माण झाला आहे.













