पोलिस प्रशासन न्यूज.

मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट उघड; बीडमधील एका ‘बड्या नेत्या’वर संशय, दोघे ताब्यात!


जालना/बीड: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा गंभीर कट उघडकीस आला असून, या प्रकरणी जालना पोलिसांनी तातडीने कारवाई करत बीड जिल्ह्यातील दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. जरांगे पाटील यांना जीवे मारण्यासाठी कथितरित्या अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी बुधवारी (दि. ५ नोव्हेंबर) रात्री उशिरा जालना पोलीस अधीक्षकांकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर, जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ बीड जिल्ह्यातून अमोल खुणे आणि दादा गरूड नावाच्या दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यातील अमोल खुणे हा जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याचे सांगितले जात आहे.

‘बीडच्या बड्या नेत्या’वर कटाचा आरोप:

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत आरोपींनी या कटामागे बीड जिल्ह्यातील एका मोठ्या राजकीय नेत्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. जरांगे पाटील यांनीही, “माझ्या हत्येचा कट रचला गेला हे सत्य आहे. हे षडयंत्र एका मोठ्या व्यक्तीने रचले आहे,” असा इशारा दिला असून, ते लवकरच पत्रकार परिषद घेऊन या नेत्याचे नाव आणि आपल्याकडील पुरावे जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

गुप्त बैठकांमध्ये रचला कट:

पोलिसांच्या तपासानुसार, जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी बीड शहरात काही गुप्त बैठका झाल्या होत्या. याच बैठकांमध्ये हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी निश्चित करण्यात आल्याचा आरोप आहे. दरम्यान, ही माहिती मिळताच जरांगे पाटील यांनी स्वतः बुधवारी मध्यरात्री जालना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेऊन चर्चा केली.

सुरक्षेत वाढ:

या गंभीर प्रकारानंतर मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अत्यंत गांभीर्याने तपास करत असून, पडद्यामागील ‘मोठा नेता’ कोण आहे, याचा शोध घेत आहेत. या कटाच्या खुलास्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांचा इशारा:

“माझ्या हत्येचा कट कसा, कोणी शिजवला, यामागे कोण नेता आहे? हे मी पुराव्यासह पत्रकार परिषद घेऊन जाहीर करेल. तू चुकीच्या ठिकाणी खेटलास,” असा थेट इशारा जरांगे पाटील यांनी कटामागे असलेल्या व्यक्तीला दिला आहे. त्यांनी मराठा बांधवांना शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे.


80
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!