बीड प्रतिनिधी ;= बीड जिल्ह्यात आलेल्या भीषण पूरपरिस्थितीमुळे अनेक ग्रामीण भागात शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः, कपिलधारवाडी परिसरात डोंगर उताराला मोठ्या भेगा पडल्याने गावकरी भीतीच्या छायेत आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने संपूर्ण गाव विस्थापित करून तेथील नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्यात सुरक्षित हलवले आहे.या संकटाच्या काळात पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या विशेष पुढाकाराने विस्थापित आणि पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली बीड शहर पोलीस स्टेशन, पोलीस बॉय संघटना, पोलीस मित्र आणि समाजातील काही जाणकार नागरिक यांच्या संयुक्त सहभागातून मदतीचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला.या उपक्रमांतर्गत पूरग्रस्त कुटुंबांना किराणा साहित्य, दैनंदिन गरजेच्या वस्तू, ब्लँकेट्स (कंबळ) आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ही मदत मिळाल्याने संकटात सापडलेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर मोठा दिलासा दिसून आला असून, त्यांनी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.या मानवतावादी कार्यासाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच, तहसीलदार शेळके साहेब, नायब तहसीलदार सुपेकर साहेब आणि मंडळ अधिकारी शितल चाटे यांनी सहकार्य करून महत्त्वाची भूमिका बजावली. संकटाच्या काळात प्रशासन आणि पोलीस यंत्रणांनी दाखवलेला हा समन्वय आणि माणुसकीचा हात बीड जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात घर करून गेला आहे.












