अंबाजोगाई प्रतिनिधी: अंबाजोगाई येथील महात्मा फुले स्मारक समितीच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना तज्ज्ञ वक्त्यांनी तथागत गौतम बुद्ध ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंतचा मानवमुक्तीचा अलौकिक इतिहास उलगडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेश इंगोले यांनी आपल्या समारोपीय भाषणात डॉ. आंबेडकरांनी उभारलेला धम्मचक्र प्रवर्तन दिन हा ‘मानवमुक्तीचा लढा’ होता, असे स्पष्ट केले. तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले ते डॉ. आंबेडकर हे सर्व स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मानवी मूल्ये जपणारे विचारांची माळ आहे.डॉ. इंगोले यांनी समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण आणि शासनकर्ती जमात होण्याचे महत्त्व अधोरेखित केले. समाजाला अपेक्षित मार्गदर्शन न मिळाल्याने डॉ. आंबेडकरांचे ‘सारा भारत बौद्धमय होईल’ हे स्वप्न अपूर्ण राहिले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. गौतम बुद्ध ते डॉ. आंबेडकरांचा इतिहास.प्रमुख व्याख्याते आणि पाली इतिहास संशोधक प्रा. डॉ. कीर्तिराज लोणारे यांनी तथागत गौतम बुद्धांच्या काळात मानवता, प्रेम आणि भेदभावरहित विचारांचा बौद्ध धम्म जगात कसा पसरला, याचा इतिहास सांगितला. सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर ‘युद्धाऐवजी बुद्ध’ स्वीकारून जगभर धम्माचा प्रसार केला.लोणारे यांनी डॉ. आंबेडकरांनी १९५६ साली नागपूर येथे ५ लाख अनुयायांसह घेतलेल्या धम्म दीक्षेला इतिहासातील सर्वात मोठी क्रांती म्हटले. डॉ. आंबेडकरांनी अनुयायांना प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करूनच धम्म स्वीकारण्याचे भावनिक आवाहन केले होते, अशी आठवण त्यांनी करून दिली.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. डॉ. किरण चक्रे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची राष्ट्रनिर्माते म्हणून असलेली भूमिका स्पष्ट केली, तर कार्यकारी अध्यक्ष प्रा. बी. के. मसने यांनी संविधान निर्मात्यामुळेच बहुजन समाजाला सामाजिक न्याय मिळाला असून, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी यांनी त्यांचे उपकार मानावे, असे परखड मत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश इंगोले, प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. कीर्तीराज लोणारे, कार्यकारी अध्यक्ष प्रा. बी.के. मसने, आणि उपाध्यक्ष प्रा. डॉ. अनिल नरसिंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहणाने झाली.













