बीड: जगाला प्रज्ञा, शील, करुणा-मैत्रीची शिकवण देणारा धम्मच केवळ मानवाचा उद्धार करू शकतो, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन भदंत डॉ. खेमधम्मो महाथेरो यांनी केले. बीड तालुक्यातील शिवणी येथील महाविहार धम्मभूमी (डॉ. भदंत आनंद कौसल्यायन नगर) येथे ६९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त प्रियदर्शी धम्मसंस्कार शिक्षण संस्थेकडून आयोजित अखिल भारतीय सहाव्या बौद्ध धम्मपरिषदेत ते बोलत होते. या परिषदेसाठी हजारो उपासक-उपासिकांनी शिवणीत गर्दी केली होती.उदघाटक भदंत डॉ. खेमधम्मो महाथेरो म्हणाले, गौतम बुद्ध हे मानवतेचे खरे दीपस्तंभ आहेत. त्यांनी दिलेला धम्म केवळ एका धम्मपथाचा उपदेश नाही, तर मानवी जीवनाला दिशा देणारा शाश्वत मार्ग आहे. बुद्धांच्या शिकवणीमुळे समाजातील अंधश्रद्धा, भेदभाव आणि असमानता यांना मोठा धक्का बसला. म्हणूनच विज्ञानावर आधारलेला बौद्ध धम्म आज जागतिक पातळीवर स्वीकारला जात आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा देऊन आपला उद्धार केला. आज त्या धम्म प्रवर्तन दिनाला ६९ वर्षे पूर्ण होत आहेत. भिक्खु धम्मशील थेरो यांच्या संयोजनातून ही धम्मपरिषद होत असल्याने बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार अधिक गतीने होण्यास मदत होत आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.जनसमुदायाची मोठी उपस्थिती आणि मान्यवर या धम्मपरिषदेला संस्थेचे सचिव तथा मुख्य संयोजक भिक्खु धम्मशील थेरो, अध्यक्ष म्हणून भदंत डॉ. इंदवंस्स महाथेरो, प्रमुख मार्गदर्शक भिक्खु उपगुप्त महाथेरो, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, एसपी नवनीत कॉवत, समाज कल्याण आयुक्त प्रदिप भोगले व रविंद्र शिंदे, शास्त्रज्ञ डॉ. सिध्दार्थ जोंधळे यांच्यासह अनेक भिक्खु आणि मान्यवर उपस्थित होते.परिषदेचे प्रास्ताविक डॉ. नामदेव शिनगारे यांनी केले, तर प्रा. अशोक गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. गुलाबराव भोले यांनी आभार मानले.













