केज. प्रतिनिधी:- केज येथील भगवान श्रीकृष्ण आश्रम परिसरात आजपासून (बुधवार, ११ मार्च) भव्य धार्मिक सोहळ्याला सुरुवात झाली आहे. श्रीकृष्ण मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे औचित्य साधून १०८ कुंडी महाविष्णू यज्ञ, श्रीराम कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे जय्यत आयोजन करण्यात आले असून, भव्य यज्ञ मंडपाने भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण आणि उपस्थिती
या सोहळ्यासाठी हिमाचल प्रदेश येथील महंत तपस्वी परमहंस श्री १००८ स्वामी चिन्मय पुरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच, रामायणाचार्य ह.भ.प. रामराव ढोक महाराज (नागपूर) यांच्या रसाळ वाणीतून संगीत श्रीराम कथा सादर केली जाणार आहे.
दैनंदिन उपक्रम आणि वेळ
आजपासून सुरू झालेला हा सोहळा १९ मार्चपर्यंत चालणार असून दररोज खालीलप्रमाणे कार्यक्रम होतील:
सकाळी ८ ते ११: महाविष्णू १०८ कुंडी यज्ञ
दुपारी २ ते ५: संगीतमय तुलसी रामायण कथा
सायंकाळी: विविध धार्मिक विधी
रात्री ८ ते १०: हरिनाम संकीर्तन व हरिजागर
विशेष तयारी
राजस्थान येथील कारागिरांनी गेल्या दीड महिन्यापासून मेहनत घेऊन हा भव्य यज्ञ मंडप उभारला आहे. १०८ यज्ञ कुंडांची मांडणी शास्त्राप्रमाणे करण्यात आली असून, ५ हजार भाविक बसू शकतील असा वॉटरप्रूफ मंडप तयार करण्यात आला आहे. भाविकांसाठी दररोज महाप्रसाद व अन्नदानाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
”परिसरातील सर्व भाविकांनी आणि धर्मप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अमृततुल्य सोहळ्याचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा,” असे आवाहन आश्रमाचे संस्थापक भागवत भूषण ह.भ.प. केशव महाराज शास्त्री व भगवान श्रीकृष्ण आश्रम परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.












