दोषींवर ३०२ व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी; तहसीलदारांना दिले निवेदन
केज.लाईव्ह अशोका टाईम्स (प्रतिनिधी):
लातूर जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी अनुष्का पाटोळे हिच्या संशयास्पद मृत्यूचा निषेध करण्यासाठी आणि दोषींना कठोर शासन करण्याच्या मागणीसाठी आज केज शहरात दलित समाजाच्या वतीने भव्य ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे परिसरातील वाहतूक जवळपास तासभर पूर्णपणे ठप्प झाली होती.
काय आहे प्रकरण?
औसा तालुक्यातील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावीत शिकणाऱ्या अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीचा मृत्यू संशयास्पद स्थितीत झाला आहे. शाळेने याला आत्महत्येचे स्वरूप दिले असले तरी, अनुष्काच्या शरीरावर मारहाणीचे निळे वळ आणि जखमा आढळल्याने हा घातपात असल्याचा आरोप समाजाकडून होत आहे. एका गरीब मातंग कुटुंबातील हुशार मुलीचा असा मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या:
हत्येचा गुन्हा: विद्यालयाचे प्राचार्य, महिला कर्मचारी आणि संबंधित स्टाफवर कलम ३०२ (हत्या) व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत त्वरित गुन्हा दाखल करावा.
उच्चस्तरीय चौकशी: प्रकरणाची सीबीआय (CBI) किंवा एसआयटी (SIT) मार्फत सखोल चौकशी व्हावी.
सीसीटीव्ही फुटेज: घटनेच्या वेळचे वसतिगृहातील सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करून त्याची निष्पक्ष चौकशी व्हावी.
आर्थिक मदत: पीडित पाटोळे कुटुंबाला शासनाने तात्काळ आर्थिक मदत देऊन प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे.
प्रशासनाची मध्यस्थी:
रस्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, आंदोलकांनी मा. तहसीलदार यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. “जोपर्यंत अनुष्काला न्याय मिळत नाही आणि दोषींना जेलमध्ये टाकले जात नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही,” असा पवित्रा यावेळी समाज बांधवांनी घेतला.
या आंदोलनात केज तालुक्यातील विविध दलित संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.














