सेबी आणि एम.सी.एक्स.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना लाभले आर्थिक नियोजनाचे धडे
बार्शी (प्रतिनिधी):
येथील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर येथे भारत सरकारच्या भारतीय प्रतिभूती व विनिमय बोर्ड (SEBI) आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) यांच्या संयुक्त विद्यमाने आय.टी.आय.च्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय ‘स्मार्ट निवेशक’ जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. बी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून ‘सेबी’ व ‘एम.सी.एक्स.’चे अधिकृत सेक्युरिटीज मार्केट ट्रेनर श्री. गणेश चौधरी उपस्थित होते. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना भविष्यातील आर्थिक नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
गुंतवणुकीचे तंत्र आणि सुरक्षितता
आपल्या व्याख्यानात श्री. चौधरी यांनी फायनान्शियल मार्केट्स, कमोडिटीचे विविध प्रकार, जागतिक स्तरावर सक्रिय असलेल्या कमोडिटीज आणि ‘वेअर हाऊसिंग डेव्हलपमेंट रेग्युलेशन ॲक्ट’ या तांत्रिक बाबी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या. तसेच, कमोडिटी व इक्विटीमधील फरक आणि डिमॅट अकाउंटचे महत्त्व विशद केले.
’सारथी’ ॲपचा वापर करण्याचे आवाहन
विद्यार्थ्यांनी गुंतवणुकीची माहिती घेण्यासाठी सेबीच्या ‘सारथी’ (Saa₹thi) या अधिकृत ॲपचा वापर करावा, असे त्यांनी सुचवले. गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी आणि बाजारात फसवणूक करणाऱ्या आकर्षक योजनांपासून कसे सावध राहावे, याबाबत त्यांनी मोलाच्या सूचना दिल्या.
परिश्रम आणि उपस्थितीहा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. ए. आर. आदलिंगे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेश गुरव यांनी केले. या जागरूकता मोहिमेला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला असून, मोठ्या संख्येने विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.














