पोलिस प्रशासन न्यूज.

दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाई तर्फे दुधाळ पशुधन व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन


अंबाजोगाई : दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाई यांच्या वतीने दिनांक २३ मे २०२६ रोजी केज तालुक्यातील मौजे औरंगपूर येथे “दुधाळ पशुधन व्यवस्थापन” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये शेतकऱ्यांना गोआधारित शेती, सेंद्रिय शेती तसेच शास्त्रीय पशुधन व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच श्री. दिनकर जाधव हे होते. यावेळी उपसरपंच श्री. भीमराव धायगुडे, पोलीस पाटील श्री. सचिन फस्के, प्रगतशील शेतकरी श्री. सुरेश पारेकर, बचत गटाचे अध्यक्ष श्री. सुधीर रानमारे, सहाय्यक कृषी अधिकारी सौ. डाके तसेच कृषि विज्ञान केंद्राचे पशु तज्ञ डॉ. रवींद्र कोरके उपस्थित होते.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. रवींद्र कोरके यांनी सांगितले की, वाढत्या शेती उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी गोआधारित व नैसर्गिक शेतीचा अवलंब करणे आवश्यक आहे. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी माती परीक्षण करून त्यानुसार संतुलित खत व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच रासायनिक खतांचा अतिरेकी वापर टाळून शेणखत, हिरवळीची खते, पिकांचे अवशेष, काडी-कचरा व इतर सेंद्रिय घटकांचा अधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की,  जमिनींमधील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून ते वाढविण्यासाठी सेंद्रिय शेती पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे. पशुधनाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने खाद्य व्यवस्थापन करणे, नियमित तीन महिन्यांनी जंतनिर्मूलन करणे तसेच वेळापत्रकानुसार लसीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे पशुधनाचे विविध संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होऊन दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.

कार्यशाळेदरम्यान निकृष्ट प्रतीच्या कोरड्या चाऱ्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी व्ही एन आय टी नागपूर यांनी संशोधित केलेल्या “सुरभी पाचकसत्त्व” प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. सुरभी पाचकसत्त्वाच्या वापरामुळे सोयाबीन भुसा, हरभरा भुसा, ज्वारी कडबा यांसारख्या निकृष्ट प्रतीच्या चाऱ्याची पचनीयता सुधारते. त्यामुळे पशुधनाची पचनक्रिया सुधारून दूध उत्पादनात वाढ होते.

पाच किलो कोरड्या चाऱ्यावर अडीच ग्रॅम सुरभी पाचकसत्त्वाची प्रक्रिया करून ते एका पशुधनास खाऊ घालावे लागते. यासाठी प्रतिदिन प्रति पशुधन सुमारे एक रुपया इतकाच खर्च येतो. सुरभी पाचकसत्त्वाच्या वापरामुळे म्हैसपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना महिन्याकाठी सुमारे दीड हजार रुपये अतिरिक्त उत्पन्न मिळत असल्याचे तसेच संकरित गाईंचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना सुमारे एक हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त फायदा झाल्याचे निष्कर्ष प्राप्त झाले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

याचबरोबर सहाय्यक कृषी अधिकारी सौ. डाके यांनी शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना योजनेची माहिती देऊन शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

या कार्यशाळेत औरंगपूर येथील एकूण ४१ शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. सुधीर रानमारे यांचे विशेष सहकार्य लाभले.


78
कृपया वोट करा

लाइव्ह अशोका टाइम्सच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!